बीड – मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी बीडमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या. शरद पवार गटाचे आमदार संदिप क्षीरसागर यांचे बीड शहरातील घर व वाहनेही जमावाने पेटवून दिले होते. त्यात त्यांचे घर व वाहनांचे मोठे नुकसान झाले. मात्र, माझ्या घरावरील हल्ल्यामागे मराठा समाज किंवा स्थानिक लोकांचा काहीही सहभाग नव्हता. समाजकंटकांनी हा हल्ला केला असावा, असा खळबळजनक आरोप संदीप क्षीरसागर (Sandip kshirsagar) यांनी केला आहे. तसेच, लवकरच यावर पुराव्यानिशी बोलेल, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
आमदार क्षीरसागर (Mla kshirsagar) यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, 30 ऑक्टोबर 2023 रोजी बीड शहरात अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या. माझ्या राहत्या घरावर देखील हल्ला झाला. माझे मुल, पत्नी व सर्व कुटुंब यावेळी घरातच होते पण मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिकांच्या व परमेश्वराच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत.
क्षीरसागर पुढे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण सुरूच आहे. त्यांच्या तब्येतीची माझ्यासह आपल्या सर्वांना काळजी आहे. सरकारने या बाबतीत तातडीने योग्य व सकारात्मक निर्णय घ्यायला हवा. सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीला सुरुवातीपासून मी पाठिंबा दिलेला असून शासन दरबारी पत्राद्वारे मी ही मागणी देखील केली होती. ही मागणी होऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्यासाठी मी देखील प्रयत्न करत राहणार आहे.
मराठा बांधव हिंसक आंदोलन करु शकत नाही
मराठा समाजाने (Maratha samaj) आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली. अतिशय शांततेत व शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसुन काही समाजकंटकांनी केला याची मला खात्री आहे. कारण मराठा समाजासाठी मी यापूर्वीही कार्य केले आहे व पुढेही करत राहणार आहे.