पारनेर -नगर दक्षिणमधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने लंके दाम्पत्यापैकी एकाला निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या चर्चा सुरू आहे. नीलेश लंके प्रतिष्ठानच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यातही प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही आमदार नीलेश लंके किंवा माजी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असा जपच भाषणात केला. इतकेच नाही तर सर्वांनी सुरात सूर मिसळत 2024 चा नारा देत एक प्रकारे रणशिंगच फुंकले.
देहू येथील अभंग मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्याला ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानदेव लंके,नीलेश लंके प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारे, सल्लागार राजेंद्र चौधरी, सचिव ऍड राहुल झावरे, कारभारी पोटघन, दीपक लंके, पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष अशोक सावंत, रमाजी सरपंच जयसिंग मापारी, संजय लाकुडझोडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, गंगाराम बेलकर, खंडू भूकन, तालुकाध्यक्ष बापू शिर्के, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे, भूषण शेलार, सुभाष शिंदे, नितीन अडसूळ, सचिन औटी, युवक तालुका अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षा उमाताई बोरुडे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. पाथर्डी, शेवगाव, नगर, बीड, श्रीगोंदा, कर्जत जामखेड, करमाळा येथूनही सदस्यांनी मेळाव्याला हजेरी लावली.
सहा वर्षांपूर्वी ठराविक विश्वासू सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देहूयेथे पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याचबरोबर नीलेश लंके प्रतिष्ठानची सुद्धा स्थापना करण्यात आली. नगर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा खासदार व्हावा, या उद्देशाने पक्षाकडून जोरदार प्रयत्न गेल्या काही टर्मला करण्यात आले. हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्याच्या अनुषंगाने प्रचंड लोकप्रियता असणाऱ्या आमदार नीलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांना या मैदानात उतरवण्याचे पक्षश्रेष्ठींच्या मनात असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. देहू येथे शनिवारी झालेल्या वर्धापन दिन मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता लोकसभा निवडणुकीत उतरण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. नीलेश लंके किंवा राणी लंके यांना दिल्लीत पाठविण्याचा सुरात अनेकांनी सूर मिसळवला. मतभेद झाले तरी मनभेद करू नका, संघटितपणे लोकसेवा करण्याचा सल्ला आमदार लंके यांनी कार्यकर्त्यांना दिला.
पवार कुटुंबीय माझ्यासाठी प्रमाण..!
मी माझ्या राजकारणातील मर्यादा या घालून ठेवल्या आहेत. “साहेब, दादा आणि ताईं’चा हा शब्द माझ्यासाठी प्रमाण आहे. त्यापलीकडे जायचे नाही, ही माझ्या भविष्यातील राजकारणाची भूमिका असणार आहे. त्यांनी मला जर आदेश दिला तर कोणी कितीही मोठा असला तरी आपण त्याच्या विरोधात लढण्यास तयार आहोत, अशाच शब्दांत आमदार नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे एक प्रकारे अप्रत्यक्ष संकेत देऊन चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात ढकलला.