पिंपरी, दि. 3 – ज्येष्ठ नेते, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचे आज (मंगळवारी) सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आमदार जगताप यांचे पार्थिव दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत पिंपळे-गुरव येथील चंद्ररंग निवास्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
आमदार जगताप यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर जगताप यांनी आज अखेरचा श्वास घेतला. आमदार जगताप यांच्या निधनाची बातमी कळताच लक्ष्मणभाऊ समर्थकांनी पिंपळे-गुरवच्या निवासस्थानी आणि बाणेर येथील खासगी रूग्णालयाकडे धाव घेतली. नागरिकांना, कार्यकर्त्यांना अंतिम दर्शन घेण्यासाठी आमदार जगताप यांचे पार्थिव दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत पिंपळे-गुरव येथील चंद्ररंग निवास्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजता पिंपळे-गुरव येथील स्मशानभूमीत आमदार जगताप यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, आमदार जगताप यांच्या पार्थिवाच्या अंतिम यात्रेसाठी पिंपळे-गुरव भागातील आवश्यकतेनुसार वाहतूकीत बदल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.