प्रा. सविता दगडे : कोळवण-कासार आंबोली गटात मतदारांशी साधला संवाद
पिरंगुट- भोर विधानसभेतील गावोगावच्या वाड्या-वस्त्यांवर गेल्या 10 वर्षांत आमदार संग्राम थोपटे यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. लोकांची लोकप्रियता त्यांनी मिळवली असल्याने सोमवारी (दि. 21) होणाऱ्या निवडणुकीत मुळशीसह भोर-वेल्हे तालुक्यांतील मतदार आमदार थोपटे यांना भरभरुन मतांची देणगी देणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या प्रा. सविता दगडे यांनी व्यक्त केला.
भोर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ मुळशी तालुक्यातील कोळवण-कासार आंबोली गटातील हर्शी, कोळवण, डोंगरगाव, कुळे, साले, ढकले, सावरगाव आदी गावात आमदार थोपटे यांच्या प्रचारदौरा स्वरुपा थोपटे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी कोळवण येथील सभेत मतदारांशी संवाद साधताना प्रा. दगडे बोलत होत्या. यावेळी मुळशी तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती उज्वला पिंगळे, रुपाली साठे, भोर तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा गितांजली शेटे, गीता आंबवले, नंदा जाधव, ज्योती दाभाडे, मिनाक्षी जाधव, सतीश सुतार, मधूर दाभाडे, सागर धुमाळ, गौरव दगडे, समीर सातपुते आदी उपस्थित होते.
स्वरुपा थोपटे म्हणाल्या की, 2009 व 2014 मध्ये मुळशी तालुक्यातील मतदानाचा विचार न करता गेल्या 10 वर्षांत भोर-वेल्ह्यापेक्षा मुळशी तालुक्याला झुकते माप देवून विकासकामे केली आहेत.
भविष्यात विकासकामांना गती देण्यासाठी आघाडी सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार थोपटे यांच्या नावा (निशाणी : हाताच्या पंजा) समोरील मतदान यंत्रावरील तीन नंबरचे बटन दाबून आपले बहूमुल्य मत सार्थकी लावावे. तसेच शनिवारी (दि. 19) माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची कापूरहोळ (हरिश्चंद्री) येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले. आमदार थोपटे यांना भोर विधानसभा मतदारसंघातील महिलांसह नागरिकांचा मोठा पाठिंबा असल्याचे गीता आंबवले, गितांजली शेटे यांनी निदर्शनास आणून दिले.