MLA Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, आमदार अपात्रतेच्या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आज (बुधवार) याबाबतचा निर्णय दिला. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरला आहे.
विधानसभा अध्यक्षांनी याबाबतचा निर्णय देताना शिंदे यांच्या १६ आमदारांना पात्र ठरवले आहे. भरत गोगावले यांचा ‘व्हीप’ ग्राह्य ठरवत त्यांनी, शिंदे गटाच्या आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार दूर केली आहे.
विधानसभा अध्यक्षांचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी एकामागून एक धक्के देणारा ठरला आहे. उद्धव ठाकरे गटाने दिलेली पक्षाची घटना अमान्य करत विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंना पाहिला धक्का दिला.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार ठाकरेंना नसल्याचे निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी नोंदवले. हा ठाकरेंची दुसरा मोठा धक्का ठरला.
ज्यावेळी पक्षामध्ये दोन गट पडले त्यावेळी शिंदे यांचा गट हाच खरी शिवसेना होता असाही निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला. हा देखील ठाकरेंसाठी मोठा धक्का ठरला आहे.
याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांचा व्हीप ग्राह्य धरत असल्याचे सांगितले. यामुळे आमदार अपात्रतेची टांगती तलवार शिंदे समर्थक १६ आमदारांच्या डोक्यावरून दूर झाली आहे.