आमदार अशोक पवार यांचा ठेकेदारांना इशारा : खांदवेनगर- वाघोली रस्त्याची पाहणी
वाघोली – पुणे-नगर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासाठी वाघोली ते शिक्रापूरपर्यंत होणारे रस्ता रुंदीकरण आणि पीएमआरडीएकडून वाघेश्वर चौक ते श्रेयस गार्डनपर्यंत होणाऱ्या रस्ता रुंदीकरण कामात हलगर्जीपणा करून निकृष्ट काम केल्यास कामाची बिले काढून देणार नाही, असा सज्जड दम आमदार अशोक पवार यांनी ठेकेदारांना भरला आहे.
खांदवेनगर ते वाघोलीपर्यंत महामार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ठिकाणांची आमदार अशोक पवार यांनी सोमवारी (दि.11) सार्वजनिक बांधकाम विभाग, “पीएमआरडीए’चे अधिकारी, ग्रामस्थांसह माहिती घेऊन पाहणी केली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कशा प्रकारे काम करता येईल, याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
जकात नाका चौकातूनच नगर रस्त्यावरुन जाणाऱ्या पर्यायी बायपास रस्त्याची पाहणी करून आरेखन (मार्किंग) करण्याच्या सूचना “पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांना पवार यांनी दिल्या. वाघोली ते शिक्रापूर रस्त्याच्या कामाच्या सुरूवातीलाच वाघोलीतील कामाला प्राधान्य देण्याचे निर्देश देखील संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला दिले. जकात नाका चौकातील सिग्नल व्यवस्था बसवून तात्काळ सुरू करणे, तेल्याची मोरी, साई सत्यम पार्क, कावेरी हॉटेल येथे मोठे पाईप टाकून रोडची भराव करून उंची वाढवावी, रस्त्यामधील दुभाजक दुरुस्त करून चांगल्या प्रतीचे काम करावे.
वाघेश्वर मंदिराशेजारील रस्ता दोन्ही बाजूने मोठा करून घेणे, तलाठी कार्यालयापर्यंत सर्व्हिस रस्त्याचे काम करणे, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, रस्त्याला अडथळा करणारी महावितरणचे खांब, तारा हलविण्यासंदर्भात जलदगतीने पाऊले उचलावीत, आदी सूचना अधिकारी व ठेकेदारांना देण्यात आल्या. यावेळी वाघोलीतील ग्रामस्थ, पोलीस, अधिकारी उपस्थित होते.
ठेकेदाराच्या कामाची तक्रार करणार
वाघेश्वर चौक ते श्रेयस गार्डनपर्यंत “पीएमआरडीए’कडून होत असलेल्या रस्ता रुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्यानंतर आमदार अशोक पवार यांनी दखल घेऊन या कामाबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार असल्याचे सांगितले.