नगर – पुढील अडीच वर्षाच्या महापौरपदासाठी आज सोडत काढण्यात आली.त्यात नगरचे महापौरपद अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गाकडे गेल्याने अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला आहे. नगरच्या महापालिकेत यंदा 5 महिलां नगरसेविका या पदासाठी दावेदार ठरणार आहेत. रीता भाकरे , रोहीणी शेंडगे, शांताबाई शिंदे (शिवसेना ) शीला चव्हाण (कॉंग्रेस ) रुपाली पारगे (राष्ट्रवादी) या पैकी एका नगरसेविकेला महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.
राज्यात बदललेली सत्तासमीकरणे पाहता नगर शहरातीलही समीकरणे बदलतील. असे मानल्यास महाशिव आघाडीच्या नगरसेविकांनाच संधी मिळणार असल्याचे चित्र आहे.त्यामध्ये पक्षीय बलाबल पाहिल्यास शिवसेना -24 ,राष्टवादी -18 ,भाजप-14 आणि कॉंग्रेस 4 ,बसप-1 असे असून त्यातही निघालेले आरक्षण हे अनुसूचित जातीच्या महिलांसाठीचे असल्याने सत्ताधारी भाजपकडे या प्रवर्गातील नगरसेविका नाही, त्यामुळे भाजप या शर्यतीतून आधीच बाद झाला आहे. शिवसेना ,कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे तीनच पक्ष रींगणात उरल्याने आणि तीनही पक्षांची राज्यात आघाडी झाल्याने खरेतर यावेळी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी चुरसच नाही असे म्हणावे लागेल.
त्यातही शिवसेनेच्या तीन नगरसेविका असल्याने त्यांच्यापैकी एकीला तर कॉंग्रेसच्या शीला चव्हाण आणि राष्ट्रवादीच्या रुपाली पारगे यांच्या पैकी एकीला संधी मिळणार आहे. मात्र राज्यातील राजकीय समीकरणे जैसे थे राहिल्यास हे पद शिवसेनेच्या खिशात पडू शकेल म्हणजेच चित भी मेरी और पटभी मेरी असे गणित मांडता येईल.मात्र महापौर वाकळेंचा कार्यकाल संपण्यास अजून वर्षभराचा कालावधी बाकी असल्याने सर्वच पक्षांनी याबाबतीत थंडाथंडा कूलकूल असेच वातारण पहावयास मिळत आहे.