Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांचे जालनामधील अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाही आणि उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे जरांगे यांनी ठामपणे सांगितले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. अनेक नेत्यांच्या घरावर आणि गाड्यांवर दगडफेक आणि जाळपोळ केल्याचे प्रकार घडले.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असल्याचे यातून दिसून येत आहे. मुंबईत मंत्रालयाच्या गेटवर देखील आज तिसऱ्या दिवशी सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केले आहे. मंत्रालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. तसेच ‘एक मराठा लाख मराठा, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी या आमदारांनी केली.
मंत्रालयालयात मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या आमदारांना आझाद मैदानातील पोलीस चौकीत आणण्यात आलं आहे. आरक्षण मिळेपर्यंत माझा पक्षच नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राजू नवघरे यांनी दिली आहे. दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. बुधवारपासून जरांगे यांनी पाण्याचा त्यागही केला आहे.
राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेची भेट घेणार
आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी जाणार आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना कायदेशीर बाबी समजावून सांगणार आहेत. तसेच त्यांना उपोषण मागे घ्या, अशी विनंती केली जाणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी लावून धरलेली आहे.