लोणी काळभोर- एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र अकॉडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन ऍन्ड ट्रेनिगच्या (मॅनेट) खेळाडूंनी सर्वाधिक 18 सुवर्ण, 18 रौप्यपदक जिंकत प्रथम क्रमांक पटकावले.
एमआयटी स्कूल ऑफ डिझाईन यांनी 15 सुवर्ण आणि 15 रौप्यपदक जिंकत दुसरे, तर एमआयटी स्कूल इंजीनिअरिंगच्या खेळाडूंनी 9 सुवर्ण आणि 6 रौप्यपदक जिंकत तिसरे क्रमांक पटकावले. आंतर महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धा 2019 च्या सर्वसाधारण विजेत्यांसह सर्व 13 खेळ प्रकारातील वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारातील विजेत्यांना सुवर्णपदक, रौप्यपदक आणि ट्रॉफी देऊन प्रमुख पाहुणे मिस्टर इंडिया आंतरराष्ट्रीय पदक विजेता धारासिंग खुराना, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी एमआयटी मॅनेटचे प्राचार्य डॉ. सुबोध देवगावकर, एमआयटी स्कूल ऑफ फाईन आर्टस् चे प्राचार्य डॉ. मिलिंद ढोबळे, डॉ. कृष्णमुर्ती ठाकुर, एमआयटी क्रिडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड आदी उपस्थित होते.
स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी 13 खेळांचा समावेश केला आहे. क्रिकेट (पुरुष), फुटबॉल (पुरुष), बुद्धीबळ (पुरुष व महिला), व्हॉलिबॉल (पुरुष), बॅडमिंटन (पुरुष व महिला), क्रास कंट्री (पुरुष व महिला), टेबल टेनिस (पुरुष), टेनिस (पुरुष) स्विमिंग (पुरुष व महिला), रोईंग (पुरुष व महिला), ऍथलेटिक्स (पुरुष व महिला), कब्बडी (पुरुष), बास्केटबॉल या खेळांचा समावेश होता, तर यात विविध संस्थातील 772 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. एमआयटी स्कूल ऑफ अर्किटेक्चरने 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक, एमआयटी मिटकॉमच्या संघाने 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक, एमआयटी एसबीएसआर संघाने 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक, तर एमआयटी कॉलेज ऑफ अन्न तंत्रज्ञान संघाने 3 रौप्य पदक जिंकले.