पुणे – शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक उपचार तसेच वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने आरोग्य विभागाकडून शहरातील सहा प्रमुख रुग्णालये, पुरेसे मनुष्यबळ, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊन ती पूर्ण क्षमतेने चालविण्यात येणार आहेत. त्यासाठी या सहा रुग्णालयांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची सद्यस्थिती, रुग्णालयांसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ तसेच वैद्यकीय उपकरणे आणि सुविधांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
या रुग्णालयांमध्ये मंगळवार पेठेतील कमला नेहरू रूग्णालय, भवानी पेठेतील सोनावणे रुग्णालय, सिंहगड रस्त्यावरील लायगुडे हॉस्पिटल, शिवाजीनगरमधील दळवी हॉस्पिटल, हडपसरमधील मगर हॉस्पिटल असेच येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटलचा समावेश आहे. महापालिकेच्या वैद्यकीय सेवेसाठी अनेक कंपन्यांनी पुढाकार घेत सीएसआर अंतर्गत निधी देण्याची तयारी दर्शविली असून या निधीतून हे दवाखाने सुसज्ज केले जाणार आहेत.
या सर्व दवाखान्यांसाठी मोठ्या इमारती, 100 हून अधिक बेडची सुविधा असली तरी अपुरे मनुष्यबळ तसेच सुविधांचा अभाव असल्याने हे दवाखाने अतिशय कमी क्षमतेने तसेच केवळ प्रसृतीगृहे म्हणून चालविली जातात. परिणामी, इतर आजारांच्या रूग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो.
शहरातील प्रमुख सहा दवाखाने पूर्ण क्षमतेने सुसज्ज केले जाणार आहेत. त्यासाठी, या रुग्णालयांचा आराखडा तयार करण्यात आला असून तो मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. त्यानुसार, तातडीनं निधी उपलब्ध करून घेत ही कामे पूर्ण करण्यावर भर राहणार आहे. -डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, महापालिका
57 ओपीडी, 19 प्रसुतीगृहे…
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे 57 ओपीडी आणि 19 प्रसृतीगृहे आहेत. या प्रसृतीसह, इतर वैद्यकीय उपचारांसाठीची बेडची क्षमता असतानाही केवळ प्रसृतीची सुविधा या रुग्णालयांमध्ये मिळते. तर कमला नेहरू रुग्णालयासह, इतर काही रुग्णालयात काही संयुक्त प्रकल्पात हृदयरोग, डोळे तसेच डायलेसिस तसेच दातांचे उपचार केले जातात. त्या व्यक्तिरिक्त इतर उपचारांसाठी नागरिकांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो.
त्यामुळे, महापालिकेने काही प्रमुख रुग्णालयांची बेडची संख्या पूर्ण क्षमतेने निर्माण करून त्यासाठी आवश्यक असलेले डॉक्टर, तसेच प्रशिक्षित कर्मचारी यांचा नेमका आकडा निश्चित केला आहे. त्यानुसार, महापालिकेकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ज्ञ तसेच विद्यार्थी तसेच गरज भासल्यास कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले जाणार आहे. या शिवाय, आजारांच्या निदानासाठी वैद्यकीय सामग्रीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.