पिंपरी, (प्रतिनिधी) – महावितरणच्या भोसरी उपविभागाअंतर्गत येणाऱ्या देहूगाव शाखा कार्यालयात गैरकारभार सुरु असून यातील दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत संघटनेच्या वतीने महावितरणच्या रास्ता पेठ येथील मुख्य अभियंत्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देहूगाव शाखेत वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या नियमांचे पालन केले जात नाहीत. त्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या स्कीमला प्लाननुसार वीजभार एकत्र मंजूर न करता रोहित्रावर जास्त लोड असतानाही सहाय्यक अभियंता यांना दिलेल्या २० किलोवॅटपर्यंत दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून स्कीमचा दोन-तीन वेळेस अनाधिकृतपणे वीजभार मंजूर वीजपुरवठा केला जातो.
बांधकाम चालू असलेल्या भरपूर स्कीमला बांधकाम मीटर न देता व्यावसायिक मीटर दिला जातो व त्यावर बांधकाम केले जाते. तसेच त्या भागात अनाधिकृत प्लॉटिंगला लागणारी केवल, फिडर बॉक्स, लोड मंजूर न करता शेजारील रोहित्राचा वीज भार न बघता वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे रोहित्रावर अतिरिक्त भार होत असून रोहित्र फुटून मोठा अपघात होऊ शकतो.
सर्वे नं २२ मधील २१ सदनिका स्कीमला नियमाप्रमाणे ३ किलोवॅट द्यायला हवा होता, मात्र, १ किलोवॅट या प्रमाणे वीजपुरवठा मंजूर करून मीटर दिले. तसेच या स्कीमचे बांधकाम करण्यासाठी घरगुती मीटरचा वापर करण्यात आला. वास्तविक या २०० केव्ही रोहीत्राचा वीजभार ११५० किलोवॅट आहे.
प्रत्येक कार्यालयामध्ये शाखा अभियंता, रीडिंग घेणारे, कंत्राटी कामगार हे स्वतःबोगस ठेकेदार झालेले असल्यामुळे व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महावितरण कंपनीचे नुकसान करीत आहे. तरी या संपूर्ण भागातील झालेल्या कामाची चौकशी करावी. असे निवेदनात नमुद केले आहे.