वॉशिंग्टन- अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतील मतमोजणी वेगाने सुरू असताना अध्यक्ष ट्रम्प यांनी या निवडणूक प्रक्रियेतच गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप केला आहे. हा गैरव्यवहार रोखण्यासाठी अमेरिकेतील सर्वोच्च न्यायाल्यात दाद मागणार असल्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. मतमोजणीमध्ये ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांच्यात अटितटीची चुरस सुरू असल्याचे चित्र निर्माण झाल्यानंतर ट्रम्प यांनी हे आरोप केले आहेत.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या इतिहासात यंदाची निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी मानली जात आहे. बुधवारी मतमोजणी थांबवण्यात आली, तोपर्यंत बिडेन यांनी 238 अतर ट्रम्प यांनी 213 इलेक्टोरल कॉलेज व्होट जिंकले होते. या निवडणूकीत 538 पैकी 270 इलेक्टोरल कॉलेज व्होट जिंकणारा उमेदवार विजयी ठरतो. त्यानुसार बिडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा 25 इलेक्टोरल कॉलेज व्होटने आघाडीवर आहेत. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये बिडेन यांना 50 टक्के तर ट्रम्प यांना 48.4 टक्के पॉप्युलर व्होट मिळाल्याचे माध्यमांनी म्हटले आहे.
मात्र ही निवडणूक म्हणजे अमेरिकेतील जनतेची फसवणूक आहे. ही निवडणूक आम्ही जिंकली आहे. ही मतमोजणी म्हणजे गैरव्यवहारच आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला. मात्र गैरव्यवहाराचे कोणतेही पुरावे अथवा संदर्भ त्यांनी दिले नाहीत.
बिडेन यांच्या प्रचार प्रमुखांनी मात्र ट्रम्प यांचे आरोप सपशेल फेटाळून लावले आहेत. हे आरोप “अपमानकारक, अनपेक्षित आणि सपशेल चुकीचे’ आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. जर ट्रम्प यांना ही निवडणूक प्रक्रिया रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जायचेच असेल, तर त्यांना रोखण्यासाठी आमचे कायदेपंडीतांचे पथक तयार आहे, असे बिडेन यांचे प्रचार प्रमुख जेन ओमॅले डिल्लन यांनी म्हटले आहे.