शिर्डी – तालुकास्तरावरील नायब तहसीलदार पद अतिशय महत्त्वाचे असून, त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. या प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेऊन दिलासादायक निर्णय करण्याची ग्वाही महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.
राज्यातील सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. संघटनेचे प्रतिनिधी या नात्याने शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, अमोल निकम यांनी मागण्यांबाबतचे निवेदन मंत्री विखे पाटील यांना देऊन मागण्यांबाबत तातडीने निर्णय करावा, अशी विनंती केली.
महसूल विभागातील नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग 2 हे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. परंतु या नायब तहसीलदारांच्या पदाचे वेतन हे राजपत्रित दोनप्रमाणे नसल्याने ग्रेड पे वाढविण्याबाबत 1998पासून नायब तहसीलदार संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे या मागण्यांबाबत लवकरात लवकर निर्णय करावा, अशी अपेक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी मंत्री विखे पाटील यांच्याशी चर्चेदरम्यान केली.नायब तहसीलदारांच्या मागण्यांबाबत यापूर्वीही चर्चा झाली आहे. या संदर्भात सरकार सकारात्मकच असून, सर्वांना न्याय मिळेल अशीच भूमिका घेतली जाईल. या संदर्भात दोनच दिवसांत आपण बैठक बोलावून या मागण्यांबाबत निर्णय होण्याच्या दृष्टीने योग्य ते निर्णय करू, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी शिष्टमंडळाला दिली.