सबका विश्‍वास योजनेमुळे लाखो करविवाद मिटले

प्राप्तिकरासाठीची योजना यशस्वी होण्याबाबत आशावाद

पुणे – अप्रत्यक्ष करासंबंधातील कर विभाग व करदात्यादरम्यान असलेले 95 टक्‍के खटले सबका विश्‍वास योजनेमुळे मिटले असल्याचा दावा अर्थमंत्रालयाने केला आहे. काही महिन्यांपूर्वी हे वाद मिटवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना लागू केली होती.

यातील 95 टक्‍के वाद मिटले असून सरकारला यातून 40 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला असल्याचे अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. आता केंद्र सरकारने प्रत्यक्ष कर विभाग आणि करदात्यांदरम्यानचे वाद मिटविण्यासाठी “विवाद से विश्‍वास’ ही योजना सुरू केली आहे. यात प्राप्तीकर आणि इतर करांचा समावेश असतो. ही योजना लवकरच सुरू होणार असून यामुळे प्रत्यक्ष कर क्षेत्रातील तब्बल 90 टक्‍के वाद मिटतील, असा दावा त्यांनी केला. प्राप्तिकर खाते आणि कर विभागादरम्यान 4.8 लाख इतके खटले आहेत. यामध्ये अडकलेली रक्‍कम 9.32 लाख कोटी रुपयांची आहे. यामध्ये करदात्यांना बऱ्याच सवलती दिल्या आहेत.

अशाप्रकारचे वाद निर्माण होऊ नयेत, याकरिता कररचना सुटसुटीत करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून केला आहे. उद्योग आणि करदात्यांना किमान त्रास होऊन त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे, अशी सरकारची इच्छा आहे. मात्र, काही करदाते अयोग्य काम करून संशयाचे वातावरण निर्माण करतात, असे त्यांनी सांगितले. उद्योग करणे सुलभ व्हावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोहिमेला चांगले यश मिळत असून उद्योग सुलभतेत भारत आता बराच वरच्या क्रमांकावर आला असल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ 24 तासांमध्ये उद्योगाची नोंदणी
अगोदर एखाद्या व्यक्‍तीस उद्योग सुरू करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागत होता. आता केवळ 24 तासांमध्ये उद्योगाची नोंदणी करता येणे शक्‍य झाले असल्याचे ते म्हणाले. सरकारला देशाची अर्थव्यवस्था लवकरच 5 लाख कोटी डॉलरची करायची आहे. हे केवळ उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून शक्‍य आहे. उद्योग-व्यवसायात अडथळे येणार नाहीत याची काळजी सरकार घेणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.