तीन महिन्यांपासून आपल्याच देशात कैद आहेत लाखो भारतीय

दुबई – भारतातून संयुक्त अरब अमिरातीत जाणारी विमानसेवा गेल्या काही आठवड्यांपासून बंद करण्यात आली आहे. सर्वप्रथम 10 एप्रिल रोजी ही विमानसेवा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर त्याला सातत्याने मुदतवाढ दिली गेली आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीत राहणारे मात्र मुळचे भारतीय असलेले अनेक नागरिक गेल्या तीन महिन्यांपासून भारतातच अडकून पडले आहेत. एकप्रकारे ते आपल्याच देशात कैद झाले असल्याची स्थिती आहे.

यातील बहुतेक किंबहुन सर्वच जण तेथे नौकऱ्या करतात. त्यांचे कुटुंब तेथे राहते. काही कामानिमित्त अथवा सुट्टीनिमित्त ही मंडळी भारतात आली होती. मात्र करोनाच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांतील विमानसेवा थांबवण्यात आली असल्यामुळे जे भारतात आले आहे त्यांचा परतीचा मार्ग खुंटला आहे. त्यामुळे त्यांच्या नौकऱ्या तर धोक्‍यात आल्या आहेतच, मात्र परत गेल्यावर तेथे आपल्यासमोर काय वाढून ठेवले असेल याची चिंता त्यांना भेडसावते आहे.

याबाबत एका माध्यमाशी बोलताना एका व्यक्तीने सांगितले की त्यांच्या आजारी आईला भेटण्यासाठी ते भारतात आले होते. मात्र त्यानंतर विमानसेवा बंद करण्यात आली. तेव्हापासून ते येथेच थांबले आहेत. नौकरी धोक्‍यात आली आहे. कामावर गेलो तर पैसे मिळतात. नाही गेलो तर मिळत नाहीत. मात्र घराचे भाडे, वीज बील, इतर सामानाची खरेदी यासाठी पैसे तर द्यावेच लागतात.

एक व्यक्ती बहिणीच्या लग्नासाठी भारतात आली. मात्र त्यांचाही परतीचा मार्ग बंद झाला. कुटुंब तेथे व ते भारतात अशी स्थिती आहे. काही लोकांनी म्हणजे तुलनेत ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांनी चार्टर प्लेनने जाण्याचा मार्ग पत्करला. तर काही जण दुसऱ्या मार्गाने जाउन व त्या देशात 14 दिवस क्‍वारंटाइन राहुन संयुक्त अरब अमिरातीत परतले. मात्र बहुतांश लोक येथेच अडकले आहेत व त्यांच्या भवितव्यापुढे मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.