चांडोह ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार?

माजी सरपंचांची निवेदनाद्वारे कारवाईची मागणी


गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊनही कार्यवाही नाही


पदाचा गैरवापर करून या कामांची बिले अदा केल्याचा आरोप

सविंदणे – चांडोह (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व इतर सदस्य यांनी संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले असून त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे व गटविकास अधिकारी शिरूर यांना लेखी पत्र देऊन योग्य कारवाई करण्याची मागणी केशव दत्तू कोंडे यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

शौर्य फाउंडेशन यांना काम न करताच चेक दिलेले आहेत. तसेच नळ पाणीपुरवठा, स्मशानभूमी यांची बोगस बिले काढलेली आहेत. सरोदेवस्ती पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली नसून त्याचेही बिल काढण्यात आलेले आहे. आवश्‍यक असलेली वर्कऑर्डर संबंधित कंत्राटदार यांना मिळालीच नाही, त्यामुळे वरील कामे झालेली नसतानाही सरपंच व ग्रामसेवक यांनी पदाचा गैरवापर करून या कामांची बिले अदा केली आहेत. तसेच ऐन उन्हाळ्यामध्ये सरकारी विहिरीतील पिण्याचे पाणी गावातील काही जणांनी चोरी करून शेतीसाठी वापरल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले नाही. त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊनही अद्याप कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.

भीषण दुष्काळ असताना सरकारी विहीरीचे पाणी शेतीसाठी चोरी करून वापरले. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले नाही. तक्रार करूनही तहसीलदार यांनी कार्यवाही केली नाही.
– केशव कोंडे, माजी सरपंच चांडोह


या प्रकरणाचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला असून योग्य त्या कार्यवाहीसाठी गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
-संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी


कामाच्या आधी धनादेश काढल्याचे मी मान्य करतो. आचारसंहिता लागल्यामुळे इस्टीमेट न करता माल खरेदी केला. त्यामुळे कोंडे यांनी आमच्या विरोधात तक्रार केली आहे.
– दत्ता कापसे, ग्रामसेवक, चांडोह

Leave A Reply

Your email address will not be published.