पुणे, दि. 7 -महामेट्रोकडून फुगेवाडी ते दापोडी आणि गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक ते छत्रपती संभाजी उद्यान या दोन्ही मार्गावर मेट्रोकडून शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुढील मार्गावर लवकरच मेट्रो सुरू होणार आहे.
पुणे मेट्रोचे वनाज स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक आणि पिंपरी चिंचवड महानगपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक हे मार्गाचे सहा मार्च पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर मेट्रो सुरू केली होती. त्यानंतर पुणे मेट्रोने 15 ऑगस्ट रोजी फुगेवाडी मेट्रो स्थानक ते दापोडी मेट्रो स्थानकादरम्यान तर, गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक ते डेक्कन मेट्रो अशी पुढील मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. ती चाचणी यशस्वी झाली होती. त्यानंतर मेट्रोने शुक्रवारी फुगेवाडी ते दापोडी व गरवारे कॉलेज ते छत्रपती संभाजी उद्यान या दोन्ही मार्गावर यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी नियोजनाप्रमाणे प्रमाणे पूर्ण झाली. पुढील काही दिवस या चाचण्या सुरू राहणार आहे. गरवारे कॉलेज स्थानकापासून सिव्हील कोर्ट स्थानकपर्यंत मेट्रो सुरू करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.