माद्रिद – बार्सिलोनाचा अव्वल खेळाडू लिओनेल मेस्सी याने महान फुटबॉलपटू पेले यांच्या 643 क्लब गोलची बरोबरी नुकतीच केली होती.
बुधवारी त्याने वलाडोलीडविरुद्धच्या स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात गोल केला व पेलेंची कामगिरी मागे टाकली. आता मेस्सीच्या नावावर 644 गोल जमा झाले आहेत.
बार्सिलोनाने हा सामना 3-0 असा जिंकला. क्लेमेंट लेग्लेटने 21 व्या मीनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर मार्टिन ब्रेथवेटनेही पहिल्याच हाफमध्ये 35 व्या मिनिटाला गोल केला व संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली.
त्यानंतर दुसरा हाफ सुरू झाल्यावरही वलाडोलीडकडून एकाही खेळाडूला गोल करता आला नाही. त्याचवेळी मेस्सीने आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करताना 65 व्या मिनिटाला गोल केला व संघाला 3-0 असे निर्विवाद विजय प्राप्त करून दिला. या मोसमात 650 गोल पूर्ण करण्याची नामी संधी मेस्सीला मिळाली आहे. युरोपात आता सातत्याने स्पर्धा होत असल्याने मेस्सी हा जादुई आकडा पार करेल.