मिलान: बार्सिलोनाचा खेळाडू लिओनेल मेस्सी व अमेरिकन खेळाडू मेगान रॅपीनोई यांना आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचा अनुक्रमे पुरूष व महिला गटातील सर्वोत्तम खेळाडूचा “फिफा’ पुरस्कार देण्यात आला आहे.
मेस्सी याने हा सन्मान मिळविताना इटलीच्या व्हर्जिल व्हानदिज्क याला मागे टाकले. व्हानदिज्कची नुकतीच युरोपातील सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू किताबासाठी निवड झाली होती. साहजिकच त्याला फिफा पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा होती. क्रिस्तियानो रोनाल्डो याचेही नाव चर्चेत होते. मात्र हा पुरस्कार मिळणार नाही हे लक्षात आल्यामुळे रोनाल्डो हा या समारंभास उपस्थित राहिला नव्हता. 32 वर्षीय मेस्सी व 28 वर्षीय व्हानदिज्क यांच्यात “बॉलोन डीओर’ या पुरस्कारासाठी चुरस असून हा पुरस्कार दिनांक 2 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.
मेस्सीने गेल्या मोसमात चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोनाकडून 12 गोल केले होते. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्यांना लिव्हरपूल संघाकडून पराभवाचा धक्का बसला होता. दुहेरी लीग पद्धतीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात बार्सिलोनाने 3-0 असा विजय मिळविला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांचा 0-4 असा पराभव झाला. मेस्सीने बार्सिलोना संघास ला लीगमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने या स्पर्धेत 36 गोल करीत सोनेरी बुटाचा मान मिळविला होता. इटलीच्या फॅबिओ कॅनाव्हारोने 2006 मध्ये “फिफा’ पुरस्कार मिळविला होता. त्यानंतर हा पुरस्कार मिळविणारा दुसरा बचावात्मक खेळाडू होण्याची व्हानदिज्क याला अपेक्षा होती. मात्र, मेस्सीच्या प्रभावामुळे त्याला ही संधी साधता आली नाही.
लिव्हरपूल संघाचे व्यवस्थापक जुर्गेन क्लॉप यांची सर्वोत्तम व्यवस्थापक पुरस्कारासाठी निवड झाली तर ऍलिसन बेकरला सर्वोत्तम गोलरक्षकाचा मान मिळाला. रॅपीनोईने अमेरिकेला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. 34 वर्षीय खेळाडू रॅपीनोई हिला सोनेरी बूट देण्यात आला. सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षकाचा पुरस्कार अमेरिकन संघाची प्रशिक्षक जिल एलिस यांना देण्यात आला. त्यांनी डच प्रशिक्षक सेरिना विगमन व इंग्लंडच्या महिला संघाचे प्रशिक्षक फिल नेगिल यांना मागे टाकून हा सन्मान मिळविला.
पुरूष गटातील सर्वोत्कृष्ट गोलाबद्दल हंगेरीच्या डॅनिअल झोसरी याला फिफा पुस्कास पुरस्कार मिळाला. त्याने डेब्रेन संघाकडून खेळताना फेरेनकॅव्हेरोस संघाविरूद्ध भरपाई वेळेत अप्रतिम गोल केला होता. या पुरस्कारासाठी मेस्सी व जुआन फर्नान्डो क्विन्टेरो हेदेखील शर्यतीत होते. मात्र, 18 वर्षीय खेळाडू झोसरीने त्यांना मागे टाकण्यात यश मिळविले.