मंडला (मध्य प्रदेश) – शाकाहारी डायनासोरची सात जिवाश्म अंडी मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यात गुरूवारी सापडली. हे जिवाश्म साडेसहा कोटी वर्षांपुर्वीचे असल्याचा अंदाज जिवाश्म शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. भारताला माहित असणाऱ्या डायनासोरच्या जातीपेक्षा वेगळ्या डायनासोरचे हे जीवाश्म असावेत, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
मांडलापासून चार किमी अंतरावरील मोहंतोला वसाहतीजवळ ही जीवाश्मअंडी सापडली, असे डॉ. हरिसिंग गौर विश्वविद्यालयाचे प्राध्यापक पी. क. कथाल यांनी सांगितले. ते भारतीय भूगर्भशास्त्र प्रगत अभ्यास केंद्राशीही संलग्न आहेत. मंडला येथील शाळेतील शिक्षक प्रशांत श्रीवास्तव यांच्या निमंत्रणावरून त्या जागेला 30 ऑक्टोबरला मी भेट दिली आहे. त्यांनी ही अंडी घटनास्थळावरून मिळवली होती. त्यांनी ती पहिल्यांदा एका स्थानिक मुलाच्या हातात पाहिली होती.
स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्याने मी या अंड्याचे निरीक्षण केले. या अंड्याचा परीघ 40 सेंटीमिटर आहे. तर वजन प्रत्येकी 2.6 किलो आहे. त्यामुळे ही अंडी भारतात अद्याप अज्ञात असणाऱ्या प्रजातीची असण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
हे सरपटणारे प्राणी दूरवरून येऊन नदी किनाऱ्यावरील वाळवंटात अंडी घालत. त्याला लामेटा बेड म्हणतात. या अंड्यांमुळे आपल्याला डायनासोरचा प्रसार कोठेपर्यंत झाला होता आणि त्याचा अंत कसा झाला, याची माहिती उपलब्ध होऊ शकते. ही अंडी आपल्याला आतापर्यंत माहित नसणाऱ्या सॉरोपॉड डायनासोरची असण्याची शक्यता आहे.
पहिले जीवाश्म सापडले 1828मध्ये
डायनासोरचे पहिले जीवाश्म 1828मध्ये कर्नल स्लिमन यांनी शोधले होते. ते त्यांना जबलपूरजवळील लष्करी वसाहतीत सापडले होते. त्यानंतर मध्य प्रदेशातील धर जिल्ह्यातही डायनासोरचे काही जीवाश्म सापडले होते.