पुणे : ‘मेरे चारों तरफ बम लगा है’ असे म्हणत पुणे विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका महिलेने दिल्याने खळबळ उडाली आहे. आश्चर्य म्हणजे ही धमकी एका ७२ वर्षी वृद्ध प्रवाशी महिलेने दिली आहे. या महिलेवर विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
नीता प्रकाश कृपलानी (वय ७२, रा. सूर्यविहार, गुडगाव इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीता कृपलानी ही महिला विमानतळावर गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आली.
तिने विमानतळावरील बूथमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलिसांना ‘मेरे चारों तरफ बम लगा है’ असे सांगताच तिथे असणाऱ्या कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिची झडती घेतली असता ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी दीपाली बबनराव झावरे (रा. कलवड वस्ती, लोहगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. आर. करपे करीत आहेत.