गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी लौकिकार्थाने शालेय शिक्षण केवळ एकच दिवस घेतले होते. वयाच्या 10 व्या वर्षी शाळेच्या आपल्या पहिल्याच दिवशी त्या आपली धाकटी बहिण आशाला बरोबर घेऊन शाळेत गेल्या होत्या मात्र शाळेतील शिक्षकांनी शाळेत लहान मुलांना आणण्यास विरोध केल्यामुळे लता दीदी रागावल्या आणि शाळेतून घरी निघून आल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा कधीही शाळेत गेल्या नाहीत.
त्यानंतर आपल्या घरातील विठ्ठल या नोकरांकडूनच त्यांनी मराठी भाषेचे प्राथमिक धडे गिरवले. अक्षर ओळखही त्यांनी घरीच केली. लिहायला आणि वाचायलाही त्या घरीच शिकल्या. सिनेपत्रकार नसरीन मुन्नी यांनी लिहीलेल्या “लता मंगेशकर इन हर ओन व्हॉईस’ या पुस्तकामध्ये ही आठवण उदधृत करण्यात आली आहे.
शाळेतील कटू अनुभवापूर्वी लता मंगेशकर काही काळ नर्सरीमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी शिक्षक फळ्यावर “श्री गणेशाय नमः’ असे लिहीत असत. ते जसेच्या तसे लता आपल्या वही मध्ये उतरवून काढत असत.