श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा पीडीपी या त्यांच्या पक्षाने केला. पूॅंचमध्ये कथितपणे लष्करी कोठडीत तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्या घटनेची माहिती आणि मृतांच्या कुटूंबीयांची भेट घेण्यासाठी मेहबुबा पूॅंचला जाणार होत्या.
मात्र, मेहबुबा यांना त्या भेटीपासून रोखण्यासाठी नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप पीडीपीने केला. पूॅंचमध्ये गुरूवारी दहशतवाद्यांनी लष्करी वाहनांवर हल्ला केला. त्यामध्ये पाच जवान शहीद झाले. त्या हल्ल्याच्या चौकशीसाठी लष्कराने काही स्थानिकांना ताब्यात घेतले.
त्यातील तिघे पुढील दिवशी मृतावस्थेत आढळले. कोठडीतील शारीरिक छळामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटूंबीयांकडून करण्यात आला. नागरिक मृत्युमुखी पडल्याची घटना खळबळ उडवून देणारी ठरली आहे.