नागपूर – काँग्रेसच्या स्थापना दिनानिमीत्त पक्षातर्फे २८ डिसेंबरला नागपुरात एक सभा आयोजित करण्यात आली असून त्याला माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह विद्यमान पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगे हे संबोधित करणार आहेत, अशी माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस (संघटन) के सी वेणुगोपाल आणि ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सध्या येथे सुरू आहे. या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदींची उपस्थिती होती.
पत्रकारांशी बोलताना वेणुगोपाल म्हणाले, २८ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आम्ही मोठ्या सभेचे आयोजन केले आहे. नागपुर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेले शहर आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या संबंधात कॉंग्रेस स्थापना दिनाच्या या सभेला राजकीय महत्व आहे.