T20 World Cup 2024 (Super-8) : …तर निकाल निश्चित करण्यासाठी 5-5 षटकांचा होणार सामना

गयाना :- भारत आणि कॅनडा यांच्यात लॉडरहिल येथे होणारा टी-२० विश्वकरंडकातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्याचा दोन्ही संघांच्या सुपर-८ समीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण भारतीय संघ आधीच पात्र ठरला आहे तर कॅनडा आधीच बाहेर पडला आहे. आता भारतीय संघ २० जून रोजी पहिला सुपर-८ सामना खेळणार आहे. हा सामना अफगाणिस्तान विरुद्ध केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे होणार आहे.
साखळी सामन्यांप्रमाणे सुपर-८ फेरीतील सामन्यांमध्ये राखीव दिवसाची तरतूद नाही. म्हणजेच पाऊस पडल्यास कोणत्याही परिस्थितीत सामना त्याच दिवशी पूर्ण करावा लागेल. या स्थितीत सामन्याचा निकाल निश्चित करण्यासाठी ५-५ षटकांचा सामना खेळवला जाऊ शकतो. असे असूनही सामना न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. सुपर-८ फेरीत प्रत्येक संघाला ३ सामने खेळायचे आहेत. जर पावसामुळे एक सामना रद्द झाला, तर संघांना मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. कारण गट टप्प्याच्या तुलनेत त्यांचा एक सामना कमी असेल.
पहिल्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत पाऊस पडल्यास त्याच दिवशी सामन्याचा निकाल लागण्यासाठी किमान १० षटकांचा सामना होणे गरजेचे आहे. हे शक्य झाले नाही तर सामना राखीव दिवशी जाईल. पहिल्या उपांत्य लढतीसाठी आणि अंतिम सामन्यासाठी १९० मिनिटे आणि राखीव दिवसाची तरतूद आहे.
तर दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी कोणताही राखीव दिवस नसेल. दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी अतिरिक्त २५० मिनिटे उपलब्ध असतील. विशेष म्हणजे दुसरा उपांत्य फेरीचा सामना आणि अंतिम सामना यांत फक्त एका दिवसाचे अंतर असेल. दुसरा उपांत्य सामना २७ जूनला तर अंतिम सामना २९ जूनला होणार आहे.
भारताचे चे सुपर-८ फेरीचे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार)
– २० जून : अफगाणिस्तान विरुद्ध भारत बार्बाडोस, रात्री ८ वाजता
– २२ जून : भारत विरुद्ध ड २ गटातील संघ अँटिगा, रात्री ८ वाजता
– २४ जून : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सेंट लुसिया, रात्री ८ वाजता





