मुंबई – राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार घातला आहे. वाढत्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शक्य त्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परंतु वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन घेणे नियमानुसार संयुक्तिक नसल्यामुळे प्रत्यक्षात घेण्यात येणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीला लागण्यासंदर्भात सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेणे किंवा रद्द करण्यास न्यायालयाने परवानगी दिली नसल्याचे या परीक्षा प्रत्यक्षात घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी याची दखल घेऊन परीक्षेस सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थ्यांच्या एप्रिल-मे महिन्यातील परीक्षा जून किंवा जूलैमध्ये घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला असून तो 1 जूनपर्यंत लागू आहे. परंतु 2 जून रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या 10 जूनपासून घेण्यात येत आहेत.
अमित देशमुख यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सध्या कोवीड19 प्रादुर्भावाची परिस्थिती आहे, हे जरी खरे असले तरी या कारणास्तव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाइन घेणे नियमाला अनुसरून नाही आणि न्यायालयानेही त्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
या परीक्षा रद्द कराव्यात, त्या पूढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात अशी मागणी काही विद्यार्थी करीत आहेत. वास्तविक, वैद्यकीय महाविद्यालयाकडून शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर होवुन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत.
अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या परीक्षा रद्द करणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तीक ठरत नाही. केंद्रिय नियामक मंडळालाही ते मान्य नाही. शिवाय उच्चन्यायालयानेही ही बाब नाकारली आहे. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य ठरते आहे, असे त्यांनी म्हटले आहे.