वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांची माहिती
वाघोली – कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने वाघोलीतून परराज्यात, परजिल्ह्यात जाण्यासाठी लागणारे फिटनेस सर्टिफिकेट (वैद्यकीय प्रमाणपत्र) वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दिले जाणार नसल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. याबाबतचे सूचना पत्रक काढण्यात आले आहे.
शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या नागरिकांना, कामगारांना परराज्यात, परजिल्ह्यात जाण्यासाठी अटी व शर्तीवर अनुमती देण्यात आली आहे. ऑनलाइन पाससाठी संबंधित व्यक्तीला कोणताही आजार नाही किंवा लक्षणे नसल्याचे डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्याने वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गर्दी होऊ लागली होती.
आरोग्य केंद्राने सोमवारी बीजेएस कॉलेज परिसरामध्ये वैद्यकीय प्रमाणत्र देण्याबाबत नागरिकांना कळविले होते. यावेळी जवळपास 500 ते 600 नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी गर्दी केली होती. जवळपास 100 नागरिकांची प्रक्रिया देखील पूर्ण झाली होती. मात्र, दुपारी वरिष्ठ कार्यालयाकडून प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशा सूचना प्राप्त झाल्यानंतर आरोग्य केंद्राने प्रमाणपत्र देण्याबाबत “यू टर्न’ घेतला.