महापौरांच्या गोळीबारप्रकरणी सर्वच विरोधी पक्षांची “चुप्पी’

पिंपरी – महापौर राहुल जाधव यांनी बुधवारी केलेल्या हवेतील गोळीबार प्रकरणी सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी आज दिवसभर “चुप्पी’ साधली. संपूर्ण महापालिकेत हा विषय चर्चेचा ठरलेला असताना एकाही विरोधकाने त्याबाबत कोणतेच वक्‍तव्य न केल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये “समझौता’ असल्याची चर्चा वारंवार होत असते. त्याचा प्रत्यय आज दिसून आला. गेल्या काही दिवसांत सलग तीन सर्वसाधारण सभा तहकूब केल्यानंतरही त्यावर विरोधकांनी साधा निषेधही नोंदविला नव्हता. तर आता महापौरांचे सामिष जेवण, हवेतील गोळीबार आणि जलपूजनातील राजकारण समोर आल्यानंतरही कोणीच प्रतिक्रिया देण्यासाठी समोर आले नाही.

विशेष बाब म्हणजे विरोधी पक्षनेते नाना काटे व मनसेचे गटनेते सचिन चिखले हे जलपूजनासाठी महापौरांसोबत पवना धरणावर गेले होते. मात्र कोणीच त्याबाबत काही बोलत नसून “तेरी भी चूप मेरी भी चूप’ धोरण अवलंबिले आहे. एवढेच नव्हे तर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनीही विरोध किंवा निषेध नोंदविला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.