लखनौ – उत्तरप्रदेशातील हमीरपुर विधानसभा पोटनिवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राचा गैरवापर झाला आहे असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे. या निवडणुकीत भाजपचे युवराजसिंह हे 17 हजार 846 मतांनी विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर तर बहुजन समाज पक्षाचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहीला आहे. विजयी युवराजसिंह यांना 74374, समाजवादी पक्षाचे प्रजापती यांना 56528 तर बहुजन समाज पक्षाच्या नौशाद अली यांना 28790 मते मिळाली आहेत.
पावसामुळे भाजपचे समर्थक मतदार मतदानासाठी आले नसतानाही त्यांनी ईव्हीएमचा गैरवापर करून तेथे विजय मिळवला आहे आणि असाच गैरवापर ते उत्तरप्रदेशातील अन्य 12 पोटनिवडणुकीतहीं करण्याची शक्यता आहे असा आरोपही मायावती यांनी केला.