पवनानगर – स्ट्रॉबेरी म्हटले की महाबळेश्वरचे नाव डोळ्यांसमोर येते. परंतु सध्या मावळात देखील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यात येत आहे. त्यामुळे मावळवासीयांना स्ट्रॉबेरीची चव चाखण्यासाठी महाबळेश्वरला न जाता मावळातच चव चाखता येणार आहे. त्यामुळे मावळ तालुका भातासाठी प्रसिद्ध आहे. परंतु आता स्ट्रॉबेरीचेदेखील शेतकरी उत्पादन घेऊ लागले आहेत.
थंड हवेचे ठिकाण, पर्यटनस्थळ व सुवासिक इंद्रायणी भाताचे आगार म्हणून नावलौकिक असलेल्या मावळात महिला शेतकरी वैशाली गायकवाड यांनी स्ट्रॉबेरीचे पीक घेण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. महाबळेश्वरमध्ये पिकणारी स्वीट सेन्सेशन नावाची स्ट्रॉबेरी प्रजाती आता मावळात देखील येऊ लागली आहे. सध्या मावळातील बाजारपेठेत ही स्ट्रॉबेरी उपलब्ध आहे. गायकवाड यांनी महाबळेश्वर येथून स्वीट सेन्सेशन या जातीची बीज आणले. तेरुजविली. आता 1 एकरवर 48 हजार झाडे तयार करून स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेतले जात आहे.
300 ते 700 रुपये किलोने या स्ट्रॉबेरीची विक्री सध्या बाजारपेठेत केली जाते. स्ट्रॉबेरीच हे उत्पन्न घेण्यासाठी वैशाली यांना 3 लाख रुपये खर्च आला आहे. तर आता स्ट्रॉबेरी तयार होऊन बाजारपेठेत विक्री झाल्यावर त्यांना किमान 6 लाख रुपये नफा होण्याची अपेक्षा आहे. 1 एकरमध्ये जमिनीत त्यांनी ट्रॅक्टरच्या सह्याने जमीन सपाटीकरण केले. गादीवाफे तयार करून ड्रीपच्या सहाय्याने पाण्याचे व्यवस्थापन केले. गादी वाफ्यावर मल्चिंग पेपर टाकून अडीच फुटावर बीज लावले. मावळमधील शेतकऱ्यांनी केवळ भात, ऊस या पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता असे विविध प्रयोग करून उत्पन्न घ्यावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
महिलांचा पुढाकार कौतुकास्पद
महिला आता प्रत्येक क्षेत्रात प्रगती करू लागल्या आहेत. महिला शेतकरी पुढे येऊन आपल्या शेतात नवीन नवीन प्रयोग करत आहेत. गायकवाड यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत मावळात महाबळेश्वर येथे पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतल्याने इतर शेतकरी ते पाहण्यासाठी येत आहेत. महिलांनी शेती क्षेत्रात घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे.