नाणे मावळ (अतुल चोपडे ) – मागील दोन महिन्यांपासून मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात व्हायरल फिव्हरची लागण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रत्येक घरी सर्दी, खोकला व सौम्य तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांसह खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल दिसून येत आहे. कोणत्याही आजाराची लक्षणे दिसताच रुग्णांनी त्वरित तज्ज्ञांकडून तपासणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. त्यातच अवकाळी पावसानेही हजेरील लावली आहे. दुपारी कडक उन्हाळा तर पहाटे थंडी पडत आहे. तसेच हवेतील प्रदुषणात वाढ झाल्याने अस्थमाच्या रुग्णांमध्ये अस्वस्थता जाणवत आहे. एकीकडे दिवाळीचा सण साजरा करण्याची तयारी घरोघरी सुरू पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे घरातील व्यक्ती आजाराने त्रस्त आहे.
या आजारांमध्ये सद्यस्थितीत ग्रामीण भागासह मावळ तालुक्यात डेंगीसदृश्य ताप, खोकला, थंडी, डोकेदुखी, संधीवात, दमा, आदींसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. रूग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे शरीरातील पेशी कमी होणे, वाढणे, जेवण न जाणे, आदी त्रास रूग्णांना होत आहे. व्हायरल तापाची साथ चार ते सात दिवस उपचार करूनही बऱ्याचदा रुग्ण बरा होताना दिसत नाही. अनेकांना वारंवार ताप येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून ज्या भागात रूग्णसंख्या अधिक आहे त्या गावात धूरफवारणी केली जात आहे. तसेच नागरिकांना आपल्या घरा जवळील परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही,
यासाठी पाणी साठू न देणे, स्वच्छता ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, आदी बाबी नागरिकांनी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या व्हायरल तापाची लक्षणे लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. बहुतांशवेळा उपचार घेऊनसुद्धा परत ताप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ताप येताच उपचार घेणे गरजेचे असल्याचे बालरोग तज्ज्ञ यांनी सांगितले.
अनेकजण घरीच उपचार घेतात. मात्र कोणताही ताप व खोकला अंगावर न काढता, टाळाटाळ न करता प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन त्वरित आरोग्य तपासणी करून घेऊन योग्य उपचार घ्यावा.
– डॉ. किशोर यादव, वैद्यकिय अधिकारी