- सरकारी कामात अडथळा; एकावर गुन्हा दाखल
तळेगाव दाभाडे – करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी सोमाटणे गावात गेलेल्या गटविकास अधिकाऱ्यांना (मावळ) सोमवारी (दि. 27) सायंकाळी एकाने धक्काबुक्की केली, तर त्यांच्या वाहन चालकाला मारहाण झाली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांचे शासकीय वाहनचालक शिवाजी पांडुरंग पाटील (वय 55, रा. चौधरी पार्क, दिघी पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. याबाबत स्वप्नील अरुण लांडे (वय 35, रा. सोमाटणे, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. लांडे यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे ग्रामपंचायत हद्दीत करोना रुग्ण वाढत असल्याबाबत आढावा घेण्यासाठी सोमवारी (दि. 27) सायंकाळी सहा वाजता तालुक्याचे पथक गेले होते. सोमाटणे ग्रामपंचायत कार्यालयात आढावा घेत असताना भागवत यांच्या वाहनचालकाला एका इसमाने मागून येऊन तोंडाचा रुमाल आवळून शिवीगाळ दमदाटी करीत मारहाण केली. ही झटापट सोडवण्यासाठी गटविकास अधिकारी गेले असता त्यांनाही मारहाण, दमदाटी केली.
आढावा बैठकीमध्ये गोंधळ सुरू असताना घटनास्थळी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वाघमारे, लिपीक जीवन गायकवाड, शिपाई कैलास तुकाराम मुऱ्हे धावून आले. आरोपी लांडे याला पकडून ग्रामपंचायत कार्यालय कोंडले. त्याला विचारपूस केली असता, माझी आई करोना पॉझिटिव्ह आली असून, माझ्या आईला घेऊन जाण्यासाठी आले असल्याचा संशय आल्याने मी शिवीगाळ दमदाटी मारहाण केली, असे लांडे यांने सांगितले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे तपास करीत आहेत.
दरम्यान, आरोपी करोना पॉझिटिव्ह आसल्याचे मंगळवारी डॉ. अनिल गिरी यांनी सांगितले. आरोग्य विभागाकडून करोना रुग्ण शोध मोहीम सुरू असल्याने हा नागरिकांचा उद्रेक असेल अशी चर्चा परिसरात रंगली.
यासंदर्भात ‘बीडिओं’शी संपर्क हाेऊ शकला नाही.