- नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक करणारा दोषी
- वडगाव मावळ न्यायालयाने सुनावली तीन वर्षांची शिक्षा, दंड
मावळ – आकुर्डीतील बजाज कंपनीमध्ये नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून आरोपीने एकाची लाखोंची फसवणूक केली. वडगाव मावळ न्यायालयाचे प्रथम न्यायदंडाधिकारी भारत बुरांडे यांनी आरोपीस दोषी ठरवले आणि तीन वर्ष शिक्षा आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निकालानंतर तब्बल 14 वर्षांनंतर फिर्यादीला न्याय मिळाला आहे.
या प्रकरणी प्रल्हाद महादेव ऊर्फ माधवराव मिटकरी (वय 66, रा. संतकृपा हौसिंग सोसायटी, म्हेत्रेवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) असे आर्थिक फसवणूक प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अशोक आप्पा दळवी (प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.
मूळचे लातूर येथील रहिवासी असलेले प्रल्हाद मिटकरी हे आकुर्डी येथील बजाज कंपनीमध्ये नोकरी करीत होते. त्यावेळी फिर्यादी अशोक दळवी यांनी मेव्हूणे राजन कळवीकट्टे यांना कंपनीमध्ये नोकरी मिळावी यासाठी प्रल्हाद मिटकरी यांची भेट झाली. त्यांनी राजन यांना नोकरी देण्याचे आमिष मिटकरी यांनी दाखविले. त्यासाठी वेळोवेळी अशोक दळवी यांच्याकडून 14 डिसेंबर 1998 पासून धनादेश आणि रोख स्वरुपात पैसे उकळण्यास सुरुवात केली. साधारणपणे 1998 पासून 23 ऑगस्ट 2000 पर्यंत अशोक दळवी यांच्याकडून प्रल्हाद मिटकरी यांनी सहा लाख 10 हजार रुपये घेतले.
राजन कळवीकट्टे यांना नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये उकळल्यानंतरही नोकरी लावली नाही. आणि फिर्यादी अशोक दळवी यांच्याकडून घेतलेले लाखो रुपये परत करण्यास टाळाटाळ केली. रक्कम परत न करता सहा लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादी अशोक दळवी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात दिली.
आरोपी प्रल्हाद मिटकरी यांची सहा लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला. वडगाव मावळ न्यायालयात सरकारी वकील योगेश कदम यांनी युक्तीवाद केला. याशिवाय आरोपीने फिर्यादी यांच्याकडून लाखो रुपयांची रक्कम ही नोकरीसाठी स्वीकारल्याचे सिद्ध झाले. त्यासाठी फिर्यादीचे बॅंक पासबूक मूळप्रती आरोपीने पैसे स्वीकारल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, असा युक्तीवाद सरकारी वकील योगेश विजय कदम यांनी मांडला. सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद मान्य करीत प्रथम न्यायदंडाधिकारी भारत बुरांडे यांनी 5 जानेवारी रोजी आरोपी प्रल्हाद मिटकरी यांना दोषी ठरविले आणि त्यास तीन वर्ष शिक्षा आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा दिली.
आरोपीने दंडाची रक्कम 45 हजार रुपये ही फिर्यादीस नुकसान भरपाई देण्याचे निकालात नमूद केले आहे. सरकारी वकील योगेश कदम यांनी बाजू मांडली.