नीरा भिवरा पडता दृष्टी ।
स्नान करिता शुद्ध सृष्टी।।
अंती तो वैकुंठप्राप्ती ।
ऐसे परमेष्ठी बोलिला ।।
“माऊली माऊली’ नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात रविवारी माऊलींच्या पादुकांना शाहीस्नान घालण्यात आले. यानंतर माऊलींच्या पालखी सोहळा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला.
सकाळी साडेसहा वाजता रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हानगरीचा पालखी सोहळ्याने निरोप घेऊन सोहळा लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. सकाळी आठ वाजता न्याहरीसाठी पिंपरे खुर्द येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावाला. पिंपरे व पिसुर्टी ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ग्रामीण भागातील लोक बेसन-भाकरी, वेगवेगळ्या चटण्या, खरडा, ताज्या रानभाज्या, अशी शिदोरी घेऊन आले होते.
झाडे तोडल्याने सावलीच नाही…
वाल्हे ते नीरा दरम्यानच्या रस्त्यावरील जुनी झाडे तोडल्याने वारकऱ्यांना सावली दुरापास्त होती. प्रशासनाने ग्रामपंचायतींना रस्त्याकडेला सावली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनाने तशी सोय करण्याचा प्रयत्न ही केला मात्र लखो वारकऱ्यांच्या पुढे ही सोय तोकडी पडली. त्यामुळे उन्हाचा त्रास सहन करावा लागला.