शिक्रापूर, (वार्ताहर)- कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील परफेक्ट सेल्स सर्व्हीसेस कंपनीमध्ये फोरक्लिप मशीन बनवणे व दुरुस्तीचे काम होत असल्याने कंपनीत मशीनसाठी लागणारे साहित्य आणून ठेवलेले होते. कंपनीचे कामगार काम करत असताना त्यांना काही साहित्य हवे असल्याने त्यांनी या ठिकाणी पाहणी केली असता त्यांना साहित्य मिळून न आल्याने त्यांनी कंपनी व्यवस्थापकास याबाबत माहिती दिली.
त्यांनी कंपनीत चौकशी व पाहणी केली असता कंपनीमध्ये आणून ठेवलेले तब्बल एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत बिरा कृष्णा हजारे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करीत आहेत.