कोहिमा – नागालॅंडचे राजकीय दिग्गज आणि सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेफियू रिओ यांनी त्यांच्या एनडीपीपी पक्षाला आणि मित्रपक्ष असलेल्या भाजपला पुन्हा मोठा विजय मिळवून दिला आहे. या विजयानंतर सलग पाचव्यांदा मुख्यमंत्री म्हणून ते पदभार स्वीकारणार आहेत.
तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहा जागांवर विजय मिळवला असून एका जागेवर आघाडीवर आहे. नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे.
60 सदस्यांच्या नागालॅंड विधानसभेत एनडीपीपी आणि भाजप यांनी एकूण 37 जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी 25 जागांवर एनडीपीपीला आणि भाजपला 12 जागांवर विजय मिळला आहे. नागालॅंडमध्ये बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. या विजयासह नेफियू रिओ यांनी ईशान्येकडील राज्याचे तीन वेळा नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते एस सी जमीर यांचा विक्रम मोडला आहे.
“हा दिवस ईशान्य भारतासाठी ‘ऐतिहासिक दिवस’ आहे. शांतता, विकास आणि समृद्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला लोकांची पसंती असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.”
– अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री