वसई – वसईतील साष्टीकरपाडा येथे असलेल्या एका परफ्यूम तयार करण्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला आहे.
वसई पूर्वेतील भागात पोमण ग्रामपंचायत हद्दीतील साष्टीकरपाडा परिसर आहे.
या भागात परफ्यूम तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आला आहे. या कारखान्याला गुरुवारी सकाळी अचानकपणे आग लागल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या कारखान्यात परफ्यूमच्या बाटल्या असल्याने आगीची तीव्रता अधिक होती.
या घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन अग्निबंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अजूनही कळू शकले नाही.