लखनौ – समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गुरूवारी त्यांचे चुलते शिवपाल यादव यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबरोबर आघाडी निश्चित केली. त्या घडामोडीमुळे एकमेकांपासून दुरावलेल्या काका-पुतण्याला उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीने एकत्र आणल्याचे स्पष्ट झाले.
मतभेद विकोपाला गेल्याने अखिलेश आणि शिवपाल यांचे संबंध 2016 पासून ताणले गेले. त्यानंतर ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी स्थापन केलेल्या सपची सुत्रे त्यांचे पुत्र अखिलेश यांच्याकडे गेली. त्यापाठोपाठ शिवपाल यांनी स्वतंत्र राजकीय चूल मांडत प्रगतीशील समाजवादी पक्षाची-लोहिया (पीएसपीएल) स्थापना केली. त्या यादवीचा फटका 2017 मधील विधानसभा निवडणुकीत सप आणि पीएसपीएल या दोन्ही पक्षांना बसला. त्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवून भाजपने उत्तरप्रदेशची सत्ता काबीज केली.
आता त्या राज्यातील निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. बहुधा मागील निवडणुकीतील अपयशातून धडा घेऊन काका-पुतण्या काही दिवसांपासून त्यांच्यात मनोमिलन होण्याचे संकेत देऊ लागले. त्यापार्श्वभूमीवर, अपेक्षेप्रमाणे सप आणि पीएसपीएलच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले.