-मेघश्री दळवी
करोनामुळे आपण फेस मास्क वापरायला लागलो आहोत. जगातल्या प्रदूषणयुक्त शहरांमध्ये आधीपासून मास्कचा ऐच्छिक वापर सुरू होता, तो आता या साथीमुळे अनिवार्य होत आहे. त्यामुळे कपड्यांसोबत मास्कमध्येही फॅशन दिसायला लागली आहे. मॅचिंग किंवा रंगीबेरंगी मास्क, आभूषणांसारखे वापरता येतील असे मास्क, काहीतरी स्लोगन किंवा आपलाच चेहरा प्रिंट केलेले मास्क अशा तऱ्हा येत राहतील. पण काही जणांनी त्यात तंत्रज्ञानाच्या भन्नाट युक्त्या आणायला आता सुरुवात केली आहे.
एका कंपनीने मास्कवर एलईडी डिसप्ले दिला आहे. सहा फूट अंतर ठेवा असा संदेश त्यात सतत दिसत राहतो. या लक्षवेधी मास्कमुळे आपोआपच सोशल डिस्टन्सिंगचे धडे दिले जातात. यातल्या काही मास्कमध्ये हाच अंतर राखण्याचा संदेश आपण आपल्या आवाजात रेकॉर्ड करून वाजवू शकतो. कोणाला हौस असेल तर संगीत ऐकवणारे मास्क बाजारात आले आहेत, तर मास्कमधून बोललेले समोरच्यापर्यंत नीट पोहोचावं म्हणून मायक्रोफोन आणि बारके स्पीकर बसवलेले मास्कदेखील उपलब्ध आहेत. ब्ल्यूटूथ तंत्रज्ञान बसवलेले मास्क घालून फोनवर बोलणे शक्य होईल. वाटलंच तर संदेश रेकॉर्ड करणे वा संगीत ऐकणे हेही करता येईल. हे टेक्नोमास्क म्हणजे नाकापेक्षा मोती जड असं मात्र नाही. कारण या सर्व प्रकारांमध्ये अत्यंत कमी वजनाचे आणि शक्यतो पातळ, सपाट इलेक्ट्रॉनिक घटक वापरलेले आहेत.
काही डोकेबाज कंपन्यांनी मात्र मास्क वापरण्यातल्या अडचणींचा विचार करून त्यात हवा शुद्ध करणारी उपकरणं बसवलेली आहेत. यातले फिल्टर सहज बदलून हा मास्क पुनःपुन्हा वापरता येईल. फुफ्फुसाची क्षमता कमी झाली असताना किंवा दम्यासारखा आजार असताना अशा मास्कचा फायदा खास जाणवेल. ग्राहकांच्या सतत संपर्कात येणाऱ्या सेवा क्षेत्रात मास्क दीर्घकाळ वापरला जातो. तिथेही हा मास्क महत्त्वाचा ठरेल.
परिधानीय तंत्रज्ञान म्हणजे वेअरेबल टेक्नॉलॉजी आता चांगली जम बसवून आहे. स्मार्ट वॉच, हेल्थ बॅंड किंवा दंडावर बांधून सतत रक्तदाब वा रक्तशर्करा मोजणारी उपकरणं ही सगळी परिधानीय तंत्रज्ञान वापरणारी साधनं आहेत. हे तंत्रज्ञान आता लवकरच मास्कमध्ये दिसायला लागेल. मास्क घालायचाच आहे, तर त्याच्यात काय काय कल्पक गोष्टी आणता येतील यावर बरंच संशोधन वेगाने सुरू आहे.
हवेतील प्रदूषण मोजून त्यानुसार धोक्याचा इशारा देणारे संवेदक एका कंपनीने मास्कमध्ये आणले आहेत. सतत तापमान मोजत राहणारे संवेदकदेखील मास्कमध्ये बसवता येतील. त्यात श्वासातल्या घटकांचं प्रमाण मोजणारे संवेदक बसवण्याची कल्पना पुढे येते आहे. मास्कच्या आत शिंक, खोकला किंवा बोलताना उडालेल्या तुषारांच्या विश्लेषणावरून त्या व्यक्तीला करोना आहे की नाही हे दर्शवणारे मास्कही येऊ घातले आहेत. करोनाने आपलं आयुष्य बदलून टाकलं. पण त्यातही संधी शोधणाऱ्या या कल्पक तंत्रज्ञांचं कौतुक आहे.