बेल्हे – वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील नेहा अमोल पवार (वय 22) हिचा शनिवारी (दि. 21) गावातील विहिरीत मृतदेह सापडला होता. तिने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांकडून नवरा, सासू, सासरा, दीर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
या प्रकरणी विवाहितेचा नवरा अमोल अनंथा पवार, सासरा अनंथा हरिभाऊ पवार, सासू कमल अनंथा पवार, दीर प्रवीण अनंथा पवार, जाऊ निर्मला प्रवीण पवार, सुप्रिया नितीन पवार, चुलत सासरे भिकाजी हरिभाऊ पवार (सर्व रा. वडगाव कांदळी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत ताटे म्हणाले की, वडगाव कांदळी येथील संदीप वसंत पाचपुते यांची मुलगी नेहा व अमोल यांचा विवाह मार्च 2020मध्ये झाला होता. विवाहानंतर आरोपींनी नेहा हिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून नेहा 19 ऑगस्ट 2021 रोजी घरातून बेपत्ता झाली होती. शनिवारी नेहाचा मृतदेह त्यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीत आढळून आला. याप्रकरणी नेहाचे वडील संदीप पाचपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास फौजदार धनवे करत आहेत.
फोटो : नेहा पवार