गुरूच्या अस्तामुळे यंदा विवाह मुहूर्त निम्म्याने कमी

वर-वधू पित्यांना करावी लागणार मोठी कसरत : आता काढीव मुहूर्तांवर भर

पुणे – तुळशी विवाहनंतर आता लग्नाचे बार उडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा गुरुचा अस्त असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुहूर्त निम्म्याने कमी झाले आहेत. परिणामी, योग्य मुहूर्तांवर आपल्या मुला-मुलीच्या लग्नाची गाठ बांधण्यासाठी वर-वधू पित्यांना कसरत करावी लागणार आहे.

दि.17 डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 या कालावधीत गुरुचा अस्त होत आहे. यामुळे तीन आठवडे विवाह मुहूर्तांना ब्रेक लागला आहे. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये अवघे 11 मुहूर्त आहेत. तर उर्वरित 35 मुहूर्त जून 2020 पर्यंतचे आहेत. सध्या दि.20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत अवघे चार मुहूर्त आहेत. या चारही तारखा फुल्ल झाल्या आहेत. या कालावधीत मंगल कार्यालयांच्या तारखा न मिळाल्याने काढीव मुहूर्तांवरदेखील भर दिला जात आहे. शुक्राच्या अस्तामुळे दि.16 डिसेंबर 2017 ते 1 फेब्रुवारी 2018 या कालावधीत लग्न तारखा नव्हत्या. मात्र, 82 मुहूर्त काढण्यात आले होते. एप्रिल 2018 मध्येदेखील एकूण 86 मुहूर्त काढण्यात आले होते.

पाच वर्षांत सर्वांत कमी मुहूर्त
गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला, तर यंदा सर्वांत कमी विवाह मुहूर्त आहेत. गुरू, शुक्र अस्त आणि तिथी नक्षत्र योग नसल्याने तसेच अशुभ दिवस विवाह कार्यासारख्या मंगल कार्यासाठी त्याज्य धरले जातात. याशिवाय दोन वर्षांनंतर येणाऱ्या अधिक मासात विवाह केले जात नाहीत.

यंदाचे उपलब्ध मुहूर्त (महिना आणि तारीख)
नोव्हेंबर 20, 21, 23, 28,
डिसेंबर 1,2,3,6,8,11, 12
जानेवारी 18, 20, 29, 30
फेब्रुवारी 1,4, 12, 14, 16, 20, 27
मार्च 3, 4, 8, 11, 12, 19
एप्रिल 15, 16, 26, 27
मे 2, 5, 6, 8, 12, 14, 17,18, 19, 24
जून 11, 14, 15

गुरू-आणि शुक्राचा अस्त असल्याने विवाह मुहूर्त नक्कीच घटले आहेत. अस्ताचा कालावधी ठराविक कालावधीकरिता मर्यादित असतो. मात्र, त्याचा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे विवाह मुहूर्त काढण्यासाठी येणाऱ्या वर-वधु पित्यांना या कालावधीतदेखील काढीव मुहूर्ताप्रमाणे विवाहाच्या तारख्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे गुरू-शुक्राच्या कालावधीतदेखील विवाह होतील.
– विजयकुमार स्वामी, पुरोहित

Leave A Reply

Your email address will not be published.