सर्व जिल्हाधिकाऱ्यांना वाढीव मदतीसाठी निवेदन

आमदार संजय जगताप यांची माहिती

नीरा – शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत ती तुटपुंजी असून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता या मदतीतून शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. शेतकऱ्याला तातडीने सावरणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या वतीने उद्या राज्यभरात जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना वाढीव मदतीसाठी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांनी दिली.

सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामा शुभारंभ कार्यक्रमासाठी आले असता नीरा येथे दैनिक प्रभात प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, राज्यपालांनी दिलेले हे अनुदान अत्यंत तुटपुंजे आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या अनुषंगाने मदत द्यायला हवी. तसेच दिले गेलेली मदतही विभागवार द्यावी. ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले आहे. त्यांना जास्तीचे प्रमाणात मदत मिळावी. फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुरंदर तालुक्‍यात फळबागांचे प्रमाण मोठे आहे. त्यांचे योग्य ते पंचनामे होणे गरजेचे आहे. फळबागांचे पंचनामे करताना केवळ झाडांचा विचार करून चालणार नाही. तर ज्या ठिकाणी फळधारणा झाली होती, अशा ठिकाणचे होणारे नुकसान, यांचाही समावेश यामध्ये व्हायला हवा. शेतकऱ्याला नुकसानभरपाई देताना त्याने किमान पिक उत्पादनासाठी जे भांडवल खर्च केले आहे ते तरी त्याला मिळायला हवे. अन्यथा पुढील काळात शेतकऱ्याच्या डोक्‍यावरील कर्जाचा बोजा आणखीनच वाढत जाईल .

शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवणार – 
राज्यामध्ये सध्या सत्तेचे नवीन समीकरण जुळत आहे. असं झालं आणि आमचं सरकार आलं तर शेतकऱ्याला केंद्रस्थानी मानून आम्ही कारभार करू. राज्यातील जनतेची इच्छा आहे की राज्यात नवीन समीकरणेच सरकार यावे. शेतकऱ्यांची जवळीक साधणारे आणि शेतकऱ्यांना आधार देणारे सरकार आणण्याचा प्रयत्न आमचा राहील. आम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करू असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.