पुणे – घटस्थापनेसाठी लागणारे पूजा साहित्य तसेच फुले खरेदीसाठी शनिवारी (दि.14) सकाळपासूनच गर्दी झाली होती. हुतात्मा बाबू गेनू चौक, शनिपार चौक, रामेश्वर चौक परिसरात फूल विक्रेत्यांना तात्पुरती दुकाने थाटली आहेत. नवरात्रौत्सवात तिळाच्या फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात. तिळाच्या फुलांना मागणी चांगली आहे.
दसरा सण मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. देवीच्या आगमनाने उत्सवाचे वातावरण असते. घरोघरी देवीची उपवास व घटस्थापना केली जाते. घटस्थापना करण्यासाठी लागणाऱ्या मातीपासून घट व इतर साहित्यांनी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. यंदा सजावट साहित्याचे भव वाढले आहेत. तरीही परडी, घट, हळद, कुंकू, गुलाल,गुलाब पाणी, वात, मंडपी, लाल वस्त्र, दोरा गुंडी, अत्तर, गोमूत्र, गंगाजल, कापूर यांसह पूजा साहित्य खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती.
घटस्थापनेचा मुहूर्त
घटस्थापना करण्यासाठी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजेच पहाटेपासून ते दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे, अशी माहिती “दाते पंचागकर्ते’चे मोहन दाते यांनी दिली. या वर्षी घटस्थापनेपासून नवव्या दिवशी नवरात्रौत्थापन असून, दसरा दहाव्या दिवशी आहे, असेही दाते यांनी सांगितले.