पिंपळे गुरव – प्राथमिक शाळेतील मुले स्वत:ची कुटुंबाची, शाळा तसेच गावाबाबत माहिती मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून देतात. मात्र हीच मुले संबंधित माहिती जापनीज, स्पॅनीश, चायनीज, इटालियन, फ्रेन्च, जर्मन आदी भाषांतून सांगत असतील तर विश्वास बसणे कठीण जाईल. पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळा क्र. 54 मधील मुले या परदेशी भाषेतून परिचय देत आहेत.
9 सप्टेंबर 1946 रोजी स्थापन झालेल्या पिंपळे गुरव येथील 54 क्रमांकाच्या शाळेने यंदा अमृत महोत्सव साजरा केला. यानिमित्त शाळेत विविध उपक्रम, स्पर्धांचे आयोजन केले होते. मुलांचा बौद्धिक, सामाजिक विकास होण्यासाठी ही शाळा विविध उपक्रम राबवित आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स व लोकसंख्या यामुळे भविष्यातील अनेक क्षेत्रातील रोजगारांवर मर्यादा येणार आहेत. देशात नाही तर परदेशात चांगली संधी उपलब्ध व्हावी, यासाठी शिक्षकांनी परकीय भाषांचे प्रशिक्षण देत आहेत. शाळेचा अभ्यास सांभाळून दररोज या भाषांचा सराव करत असल्याचे विद्यार्थी यश सगर (जापनीज), श्रावणी हिंगे (जर्मन) आणि श्रद्धा जाधव (स्पॅनिश) यांनी सांगितले.
या शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतंत्र ग्रंथालय, प्रयोगशाळा, रोबोटिक लॅब, संगणक कक्ष, डिजिटल टीव्ही आदी सुविधा येथे उपलब्ध आहेत. तर स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन, जापनीज, चायनीज आदी परकीय भाषांसह परप्रांतीय भाषांचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे. पाचवी ते सातवीचे विद्यार्थ्यांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– साधना वाघमारे, मुख्याध्यापिका.
वाबळेवाडी शाळेला भेट दिल्यानंतर अनेक कल्पना आल्या. त्यातील काही या शाळेत राबविण्याचा निर्णय घेतला. भविष्याचा विचार करून एका ऍपच्या माध्यमातून वर्गातील मुलांना परकीय भाषांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना भाषा निवडीचे स्वांतत्र्य दिले. दोन-तीन वर्षांत ही मुले बेसिक तरी चांगले शिकणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञ मंडळींचे सहकार्य घेतले जाईल.
– संतोष वाघमारे, शिक्षक.