मुंबई – मराठी इंडस्ट्रीमध्ये विनोदी कलाकार, अभिनेता भाऊ कदम यांनी “चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून सर्वांना हसवले आहे. भाऊ कदम यांनी लोकांच्या मनात एक अनोखं स्थान निर्माण केले आहे.
“चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात भाऊंसोबत त्यांचे जोडीदार म्हणजेच कुशल बद्रिके हेदेखील लोकांसाठी तितकेच खास कलाकार आहेत. अशातच कुशल बद्रिके यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून भाऊंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत भाऊ कदम स्क्रिप्ट वाचताना झोपलेले पाहायला मिळतात. भाऊंना झोपलेले पाहून कुशल त्यांना भाऊ झोपत का नाहीस आरामात?, असे विचारताच नाही रे, पाठांतर करतोय, असं उत्तर देतात आणि भाऊ कदम पुन्हा झोपी जातात.
या संपूर्ण गंमतीचा कुशलने एक व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कुशलने पोस्टमध्ये भाऊ कदम यांचे पाठांतर चालू आहे, सगळ्यांनी शांत राहा, असे लिहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.