‘अत्यावश्‍यक’च्या नावाखाली नागरिकांचा संचार वाढला

कडक निर्बंधातही खरेदीच्या बहाण्याने वावर

लोणावळा – महाराष्ट्र शासनाने करोनाचा वाढता फैलाव व प्रसार रोखण्यासाठी राज्यात बुधवारी (दि. 14) रात्री आठपासून कडक संचारबंदीचे आदेश दिले आहे. अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय कोणालाही फिरता येणार नसल्याचे आदेश असताना अनेकजण अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली अत्यावश्‍यक सेवा पुरविणे व साहित्य खरेदी करण्याची कारणे पुढे करून संचारबंदीत मुक्‍तसंचार करत असल्याचे चित्र लोणावळा व मावळात पहायला मिळाले. तसेच अनेकांनी अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली दुकाने उघडी ठेवली. शासनाने काढलेले हे उघडे ते बंदचे आदेश हे संभ्रम निर्माण करणारे असून, हे निर्बंध तर नाही ना, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

करोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही अत्यावश्‍यक सेवा व दुकाने वगळता अन्य व्यवसाय व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. अत्यावश्‍यक सेवेमध्ये मुख्यता किराणा दुकान, दूध, बेकरी, भाजीपाला, हॉटेलमधून अन्न पार्सल सेवा, सर्व प्रकारच्या वैद्यकीय अस्थापना व सेवा, पेट्रोलपंप तसेच काही अटीशर्तीवर रिक्षा, टॅक्‍सी सेवा यांच्यासह अन्य काही सेवांचा समावेश आहे.

मात्र लोणावळ्यात केवळ कपडे, सोन्या-चांदीची दुकाने, हार्डवेअर व मद्यांची दुकाने वगळता चिक्कीच्या दुकानांसह अन्य सर्वप्रकारची दुकाने व टपऱ्या उघड्या ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे मोठ्या प्रमाणात अत्यावश्‍यक सेवा सुरू असल्याने या अत्यावश्‍यक सेवांच्या नावाखाली कडक संचारबंदी असतानाही नागरिक मुक्‍तपणे संचार करत होते. नेहमीप्रमाणे बाजारात नागरिकांची जशी वर्दळ असते. तशीच वर्दळ कडक संचारबंदीत लोणावळ्यात होती. अनेक व्यावसायिकांच्या तोडांवर मास्क लावलेला दिसत नव्हता, विशेषतः भाजी व फळ मार्केटमधील भाजी व फळ विक्रेते जणू करोना नसल्याप्रमाणे विनामास्क भाजी व फळे विकतात.

पहिल्याच कडक विकेंड लॉकडाऊननंतर मावळात तीन दिवसांत तब्बल 400 रुग्णांची नोंद झाली. यामध्ये लोणावळ्यात 90, तर तळेगावातील 120 रुग्णांचा समावेश आहे. कडक विकेंडनंतर करोनाला आळा बसण्याची अपेक्षा ही तीन दिवसातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे फोल ठरले आहे.

लोणावळ्यात बुधवारी एका दिवसात विक्रमी 58 नवीन रुग्ण आढळले. लोणावळा व मावळात रोज झपाट्याने वाढणारी रुग्ण संख्या ही मावळाची चिंता वाढविणारी आहे. संचारबंदी बंदी असताना बहुतांश जण संचारबंदीचे उल्लंघन करत बिनधास्तपणे फिरत आहे. पोलिसांनी कारण विचारले असता अत्यावश्‍यक सेवेचे कारण सांगून नागरिक पोलिसांचीही दिशाभूल करत असल्याचे चित्र आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.