मुंबई : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येत असलेल्या भाषा भवनचे अंतर्गत स्वरूप निश्चित करण्यासाठी सोमवारी (दि. 6) मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. मराठी भाषा भवन सर्व मराठी प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
मराठी भाषा भवनचे स्वरुप ठरवण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी, प्रा. हरी नरके, डॉ. राजा दीक्षित, डॉ. सदानंद मोरे, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. सतीश बडवे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे संचालक सव्यसाची मुखर्जी, रचनाकार भूपाल रामनाथकर, मराठी भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येत असलेल्या भाषा भवनचे अंतर्गत स्वरूप निश्चत करण्यासाठी आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन केले. pic.twitter.com/KhwmbkR44V
— Subhash Desai (@Subhash_Desai) June 6, 2022
भाषा भवनचे एकूण स्वरुप कसे असावे, मराठी भाषेचा एकूण प्रवास, कालखंड, भाषेचे वैभव, जागतिक पातळीवर असलेले स्थान आदी बाबींवर भाषा अभ्यासकांनी सूचना मांडल्या. मराठी भाषा भवन आमच्यासाठी अभिमानाचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. यासाठी राज्य शासन सर्वतोपारी मदत करेल, असे मंत्री देसाई म्हणाले.
मराठी भाषा भवनाच्या रचनेकडे स्वतः मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. मराठी भाषा भवनाची उभारणी हा राज्य शासनाच्या कामगिरीतील मैलाचा दगड ठरेल अशी त्यांची धारणा आहे. असे देखील मंत्री देसाई यांनी सांगितले
प्रा. हरी नरके यांनी प्राचीन कालखंड, डॉ सतीश बडवे यांनी मध्य युगीन कालखंड तर प्रा. रा. रंगनाथ पठारे यांनी आर्वाचिन मराठीचा कालखंड आणि त्यातील बारकावे विशद केले. मराठी भाषेचे अभ्यासक पर्यटक, लेखक, विद्यार्थी, परभाषिक पर्यटक या सर्वांना यात आवडेल असे काही ना काही मांडायचे आहे आणि लोक परत परत भेट देतील, यासाठी तंत्रज्ञान वापरावे, अशी सूचना मांडण्यात आली.