जालना – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून शनिवारी (9 सप्टेंबर) मध्यरात्रीपासून त्यांनी पाणी आणि सलाइन घेण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे राज्यभरात विविध ठिकाणी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू झाल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढताना दिसत आहे.
मनोज जरांगे यांनी रविवारी दैनंदिन तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय पथकाला तपासणी करण्यास नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. जरांगे यांनी आता पाण्यासोबतच औषधेही बंद केली आहेत. तसेच आता आपण तपासणीही करून घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
मराठा आरक्षण हाच माझा उपचार आहे, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार. दुसऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमच्यावर किती अन्याय कराल, आता आमच्याकडेही पण बघा, असे त्यांनी म्हटले आहे.