Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीच्या कायद्याला संमती दिली. विरोधकांसह सर्वांनी या विधेयकाला संमती दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सभागृहाबाहेर येऊन आनंदोत्सव साजरी केला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. मात्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे यावेळी अनुपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला होता. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी यासाठी उपोषण देखील केले होते. त्यानंतर सरकारने विशेष अधिवेशन बोलावून यावर तोडगा काढणार असल्याचं आश्वासन दिल होत. अखेर आज अधिवेशन बोलावून सरकारने याबाबतचे विधेयक मंजूर केले.
विधेयक मंजूर करताना मुख्यमंत्री शिंदेंनी आतापर्यंतच्या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. तसेच विधेयक एकमताने मंजूर होत असल्याचे म्हंटले. त्यांनतर सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या आमदारांनी सभागृहाबाहेर आनंद व्यक्त करायला सुरुववात केली. सत्ताधारी आमदारांसह मंत्र्यांनी देखील यावेळी विजयाचा गुलाल उधळला आणि फटाके फोडत आनंद साजरा केला.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे सभागृहाबाहेर येऊन जल्लोष साजरा करत होते मात्र त्यावेळी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार दिसून न आल्याने माध्यम कर्मींनी थेट दादा ? दादा कुठंय ? असा सवाल विचारायला सुरुवात केली. मात्र कोणीही त्याबाबत प्रतिक्रिया दिली नाही.त्यामुळे सरकारच्या या जल्लोषामध्ये अजित पवार का नाहीत ? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.