Chhagan Bhujbal – मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही, म्हणजे नाही, असा निर्धार मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. तसेच, आता ओबीसी आयोग आहे की मराठा आयोग, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. पंढरपुर येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. पण, मराठा समाजाने स्वतंत्र १०, १२ किंवा १५ टक्के आरक्षण घ्यावे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी होत आहे. मात्र, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, म्हणजे नाही.
“समोरच्या लोकांच्या मागण्या वाढत आहेत. त्यांची लेकरे बाळं गरीब असल्यानं आरक्षण पाहिजे. २०० जेसीबी आणि हेलिकॉप्टरमधून फुलांची उधळण करण्यात येते, तरीही ते गरीब आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. मराठा समाजाला आमचा विरोध नाही. पण, मराठा आरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या झुंडशाहीला आमचा विरोध आहे.
अनेक ठिकाणी आमची लायकी काढली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेता आणि आमच्यावर हल्ले करता. शिवाजी महाराजांच्या सेनेला मराठा सेना नव्हते, तर मावळ्यांची सेना म्हटले गेले, असे भुजबळांनी सांगितले.